मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेच्या समान वाटपासाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेवर भाजपश्रेष्ठी नाराज झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांत संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपविरोधात आक्रमक भाषा वापरली आहे. याशिवाय, आजच्या 'सामना'तूनही देशातील आर्थिक परिस्थितीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले होते. या सगळ्यामुळे भाजपश्रेष्ठी शिवसेनेवर नाराज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला प्रस्ताव देण्यास उशीर होत असल्याचे सांगितले जाते. शिवसेना-भाजपमधील सत्तावाटपाची चर्चा करण्यासाठी अमित शाह बुधवारी मुंबईत येणार होते. मात्र, शिवसेना नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अमित शहा यांची ही भेट लांबणीवर पडली आहे. त्यामुळे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय निरीक्षक भुपेंद्र बघेल यांच्या उपस्थितीतच भाजपच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. 


राज्यपालांची भाजप - शिवसेनेकडून स्वतंत्र भेट, सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल?


विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. भाजप शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहे. सोमवारी शिवसेना नेते दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सत्तास्थापनेच्या हालचाली करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


झोपेतसुद्धा मी 'तसं' बोलू शकत नाही - चंद्रकांत पाटील