मुंबई: येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे. सामनातील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे.  यापूर्वीच्या सदस्यांची मुदत १५ जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामाला सुरुवात केली असती. परंतु, सध्या या सदस्यांच्या नियुक्तीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

....ही तर आणीबाणी, राज्यपालांच्या भूमिकेवर राऊतांची पुन्हा टीका

हे खरे असेल तर १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार तोपर्यंत पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. जेणेकरून नंतर येणारे सरकार नामनियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुका करेल. पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाला नावाची संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

त्यामुळे आता यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरुन असाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळीही संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अनेकदा खरमरीत टीका केली होती. राजभवन हा फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुखावले गेले होते. अखेर संजय राऊत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील तणाव आता निवळेल, असे वाटत होते. परंतु, त्यानंतरही राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणे सुरुच ठेवले होते.