शिवसेना विरोधात भाजप रणशिंग फुंकणार, पोलखोल सभेतून शिवसेनेला देणार बुस्टर डोस
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत भाजपाने आज मुंबईत जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचाराविरोधात भाजपने आज मुंबईत महासभेचे आयोजन केलंय.
महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात गेले काही दिवस भाजपा मुंबईत पोलखोल सभा घेत आहे. भाजपच्या पहिल्या सभेची सुरवात कांदिवली येथून झाली. या सभेच्या रथयात्रेची काही अज्ञात व्यक्तींनी नासधूस केली होती. हे काम युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला होता.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर कितीही हल्ले केले तरी पोलखोल करणारच असा इशारा दिला होता. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत चेंबूर येथील सोमय्या मैदानात भाजपाने पोलखोल सभा आयोजित केली आहे.
या सभेत मुंबई मनपातील सत्ताधारी शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाणार आहे. या पोलखोल सभेचे भाजपाने टीझर ट्रेलर आणले आहे. त्यावरून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा रोख मुंबईतील मनपा सत्ताधारी शिवसेना विरोधात असल्याचे दिसून येते.
देवेंद्र फडणवीस यांची तोफ आज कोणावर धडाडणार याकडे लक्ष लागले आहे. सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार असून भाजप आमदार आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर आदी नेत्यांची भाषणे होणार आहे.