मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. या तिन्ही राज्यांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजपचा सहजपणे पराभव केला. यावरून २०१९ साली भाजपची घरवापसी निश्चित असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. परिणामी आगामी काळात काँग्रेस निश्चित सत्तेवर येईल. एकूणच परिस्थिती 'मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है' अशी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता एक गोष्ट अधोरेखित होते. ती म्हणजे या निवडणुकीत मोदी, मशीन आणि मनी हे तिन्ही फॅक्टर निष्प्रभ ठरले. तसेच या निवडणुकांच्या निमित्ताने मोदी लाट ओसरल्याचे संकेत मिळाल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. 


अनेक राज्यांमध्ये सत्ता असलेल्या भाजपला महागाई, बेरोजगारी, महिला व दलितांवरील अत्याचार यासारख्या समस्या सोडवण्यात सपशेल अपयश आले. भाजपने सत्तेचा वापर मोजक्या उद्योगपतींच्या भल्यासाठीच केला. त्यामुळेच भाजपला या निवडणुकीत यश मिळू शकले नाही. या विधानसभा निवडणुकांमधील ट्रेंड भविष्यातही कायम राहिल. राज्यातील फडणवीस सराकरही काही दिवसांचेच सोबती आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. 


विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंत हाती आलेले कल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या प्रमुख राज्यांमध्ये भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय. 


या निकालांनंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. काँग्रेसने सर्व ठिकाणी जोरदार कमबॅक केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे.