मुंबई : आज सरकार स्थापनेनंतरची भाजपची पहिली बैठक होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवारांनी काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयातल्या निर्णयावरही दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजपकडून आमदारांकडून फोडाफोड होण्याची शक्यता लक्षता घेऊन विरोधकांनी आपल्या आमदारांना दुसरीकडे हलविले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही गंभीर आरोप केला आहे. साध्या पोलीस आमदार असलेल्या हॉटेलवर साध्या पोलीस वेशात फिरत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री अजित पवार काल रात्री उशिरा घरातून बाहेर पडले आणि त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये तब्बल अर्धातास खलबतं झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पार्थ पवार यांच्यासह भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते विनोद तावडे, गिरीश महाजन आणि आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते, असं सांगण्यात येतं. या बैठकीत कोर्टात होणारी सुनावणी आणि मंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.या बैठकीला काही वकीलही उपस्थित होते, असं समजते. 


सध्याच्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीनं आपल्या आमदारांचा घोडेबाजार होऊ नये, यासाठी काटेकोर खबरदारी घेतली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे मुंबईतल्या रेनेसान्स हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेले आमदार आता ग्रँड हयात हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत २७ आमदार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येतोय. अजित पवार यांच्यासोबतच्या गटाला भाजपाकडून १० मंत्रिपदं देण्यात येणार आहेत. तर उर्वरित १७ आमदारांना महामंडळं देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं सांगण्यात येते आहे. 


दुसरीकडे शिवसेनेनंही ललित हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या शिवसेना आमदारांना लेमन ट्री हॉटेलमध्ये हलवले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे ललित हॉटेलमधून निघाले. त्याआधी सेवेच्या सर्व आमदारांची प्रतिज्ञापत्रं तयार करून घेण्यात आली. ही प्रतिज्ञापत्र आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. 


काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार एकजूट आणि खंबीर असल्याचं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस आमदारांना मुंबईतल्या जे डब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खरगे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मॅरिएटमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर काँग्रेसनं ही प्रतिक्रिया दिली. 



राट्रवादीच्या आमदारांना ग्रँट हायातमध्ये हलवण्यापूर्वी त्यांचा मुक्काम मुंबईतल्या हॉटेल रेनेसान्समध्ये होता.. या हॉटेलात साध्या वेषातला पोलिसांचा राबता असल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आमदारांचा घोडेबाजार करण्यासाठी भाजपनं या पोलिसांना पाठवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. याचीच शहानिशा करण्यासाठी, साध्या वेशातल्या पोलिसांची ओळखपत्रंही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तपासण्यात आली.