मुंबई: कोरोनाच्या शहरातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीकेसी येथे तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सव्वा लाख चौरस फूट क्षेत्रफळावर एमएमआरडीएने पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत हे कोविड 19 केअर सेंटर तयार केले आहे. २ मे रोजी काम सुरु होवून ते १६ मे रोजी पूर्णत्वास आले. देशातील हे पहिले असे खुल्या जागेवरील रुग्णालय (ओपन हॉस्पिटल) आहे. सर्व हवामान परिस्थितीचा विचार करून हे केंद्र उभारले गेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Lockdown 4 : मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद; महत्त्वाच्या घोषणांकडे साऱ्यांच लक्ष


विशेषत: पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. येथे तीव्र बाधा नसलेल्या (नॉन क्रिटिकल) संक्रमितांवर म्हणजेच सौम्य व मध्यम रोगसूचक रुग्णांवर उपचार केले जातील. कोरोना बाधित रूग्णांचा विचार करून या केंद्राची संपूर्ण रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी रूग्णांसाठी निवास, ऑक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा आहे. स्टोरेज सुविधेसह पॅथॉलॉजी, ईसीजी आणि एक्स-रे मशीनसह देखील सुसज्ज आहे. दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या रुग्णालयात दिले जाईल. स्वच्छतागृहे, स्नानगृहे यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तर, तैनात डॉक्टरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास ३५० कामगार आणि एमएमआरडीएचे ७० अधिकार्‍यांनी अथक कामकाज करत अवघ्या १५ दिवसांत हे कोविड १९ केअर सेंटर उभारले.

या केंद्राची क्षमता १,०२६ खाटांची आहे. पैकी १८ वॉर्डमध्ये प्रत्येकी २८ खाटा याप्रमाणे ५०४ खाटांसोबत ऑक्सिजन पुरवठ्याचीदेखील सोय आहे. तर ९ वॉर्डमध्ये प्रत्येकी ५८ खाटा अशा ५२२ इतर खाटा आहेत. तसेच १० मोबाईल आयसीयू बेड आहेत. सध्या येथे १३ डॉक्टर, ८ परिचारिका, १४ वॉर्ड बॉय नेमण्यात आले आहेत. तर इतर कामकाजासाठी ७ लिपीकदेखील नेमले आहेत. गरजेनुसार आणखी मनुष्यबळ तैनात केले जाईल.