Lockdown 4 : मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद; महत्त्वाच्या घोषणांकडे साऱ्यांच लक्ष

लॉकडाऊनच्या नव्या टप्प्याविषयी आणि नव्या स्वरुपाविषयी ... 

Updated: May 18, 2020, 07:31 PM IST
Lockdown 4 : मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद; महत्त्वाच्या घोषणांकडे साऱ्यांच लक्ष  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आज, म्हणजेच सोमवारी रात्रौ ८.३० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याकडेच साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं असेल. 

काही दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून एका बैठकीत राज्यात लॉकडाऊनचा काळ ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

टाळेबंदीच्या या अधिकृत घोषणेमध्ये मात्र हे स्वरुप नेमकं कसं असणार आहे याची अधिक स्पष्टोक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळं आता लॉकडाऊनच्या नव्या टप्प्याविषयी आणि नव्या स्वरुपाविषयी मुख्यमंत्री नेमकी काय माहिती देतात आणि कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

वाचा : केरळात लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता; सुरु होणार 'हे' व्यवहार

 

लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांची घोषणा आणि त्यासंदर्भातील नियमांची आखणी ही केंद्राकडून करण्यात आली होती. पण, अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग, काही राज्यांमध्ये सुधारणारी परिस्थिती या साऱ्याचा आढावा घेत केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारला लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यातील महत्त्वाची आखणी करण्याची सवलत देण्यात आली. तेव्हा आता महाराष्ट्रात येत्या काळात लॉकडाऊन नेमकं कसं आणि किती प्रमाणात लागू केलं जाणार, कोणत्या निर्बंधांमध्ये सूट दिली जाणार, लॉकडाऊन नेमकं किती प्रमाणात शिथिल होणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांशी झालेली चर्चा, राज्याच्या वतीनं करण्यात आलेल्या काही मागण्या आणि त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेले निर्णय याची सांगड घातली जाणार का, हासुद्धा तितकाच महत्त्वाच प्रश्न. 

दरम्यान, राज्यात २२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊनचा टप्पा घोषित करण्यात आला होता. ज्यानंतर १४ एप्रिलला लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला. जो, ३ मेपर्यंत चालला. यानंतर राज्यातील आणि देशातील परिस्थिती अधिक आव्हानात्मक होत अल्यामुंळं तिसऱ्या टप्प्यात गेलेला हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत सुरु राहिला होता. त्याचमागोमाग आता संपूर्ण देशात लॉकडाऊन ४ सुरुवात झाली आहे. पण, राज्य पातळीवरव प्रत्येक ठिकाणी काही गोष्टींमधील साम्य वगळता लॉकडाऊनमध्ये विविधता आढळू शकते.