Ajit Pawar in Black & White : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती, त्यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट (Black & White ) या कार्यक्रमात मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे विधान केलं आहे. उद्धव ठाकरे स्वत: आमदार, मंत्र्यांच्या संपर्कात राहिले असते, तर असा प्रसंग आला नसता असं मला वाटतं, असं अजित पवार यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला टोला
काही लोकांनी या प्रकरणाशी आमचा दुरान्वये संबंध नसल्याचा भास केला. पण हिच लोकं पहिल्यापासून कामाला लागले होते, हे सरकार जावं आणि आपलं सरकार यावं असं त्यांना वाटत होतं, पण त्यांना स्वत:चं सरकार आणता आलं नाही म्हणून त्यांनी एकनाथि शिंदे यांचं सरकार आणून त्यात ते सहभागी झाले असा आरोपही अजित पवार यांनी भाजपचं (BJP) नाव न घेता केला.


उद्धव ठाकरेंनी आघाडी सरकार व्यवस्थित चालवलं
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) व्यवस्थित चालवलं, दुर्देवाने त्यांच्या जवळचेच काही सहकारी त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. कोरोनाचा काळ अडचणीचा होता. त्याही काळात त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. गंभीर आजारातून महाराष्ट्राला बाहेर काढलं. राजीनामा देताना त्यांनी कलिग म्हणून मला, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना सांगितलं. आम्हाला असं सांगावासं वाटलं नाही की तुम्ही राजीनामा देऊ नका, आपण विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरं जाऊ, कारण त्यांच्याच पक्षातील चाळीस लोकं कमी झाले असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.


लोकशाही धोक्यात आली आहे
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निकालाकडे आपण लोकशाही धोक्यात आली आहे, या दृष्टीने बघतो. हिंदुह्रदय बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष काढला. आता जे आहेत, त्यातल्या एकाला तरी माहित आहे का पक्ष कधी काढला? बाळासाहेबांनी नुसता पक्ष काढला नाही तर तो वाढवला. मराठी माणसाला त्यातून एक आधार मिळाला. ग्रामीण भागातील लोकं मुंबईत आले की शिवसेनेला मतदान करतात आणि गावाकडे आले की राष्ट्रवादीला मतदान करतात. 


शिवसेनेमुळे मराठी माणसाला आधार
कॉलेज जीवनात ज्यावेळी आम्ही मुंबईत यायचो, त्यावेळेस मंत्रीमंडळातील नेत्यांच्या घरातील लोकं देखील सांगायची आम्ही धनुष्यबाणाला मत देतो. ही वस्तूस्थिती होती. त्यामुळे आताची स्थिती कॉमन मॅनला आवडलेली नाही. प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना नाव सुचवलं आणि बाळासाहेबांनी ते नाव पक्षाला दिलं. त्यातून साधेसाधे कार्यकर्ते, पानपट्टीचं दुकान चालवणारे, गाडी चालवणारा ड्रायव्हर असे साधेसाधे लोकं मोठी झाली आणि आज त्यातलीच लोकं उद्धवजींना सोडून जातायत असं सांगत त्यांनी शिंदे गटातील आमदारांना टोला लगावला. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत शिवाजी पार्कला स्वत: सांगितलं की इथून पुढे उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख म्हणून जबाबदारी घेतील आणि त्यांच्याच हयातीत त्यांनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं. आदित्यांनाही आणलं तेव्हा बाळासाहेब स्टेजवर उपस्थित होते. लोकं बाळासाहेबांना बघून मतदान करतात, बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना बघून लोकं मतदान करतात. आता घोडा मैदान दूर नाही, जनता जनार्दन ठरवेल, असं अजित पवार यांनी म्हटलंय.


काँग्रेस महाविकास आघाडीत कसे आले?
काँग्रेसचे निवडून आलेल्या 44 आमदारांनी 5 वर्ष विरोधी पक्षात काम केलं होतं. विरोधी पक्षात काम करत असताना मतदारसंघाच्या विकास कामांवर काय परिणाम होतो, राजकारणावर काय परिणाम होतो. त्याचा अनुभव त्यांनी 2014 ते 2019 मध्ये घेतला होता. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना असं वाटलं, यानिमित्ताने बहुमताचा आकडा पार होत असेल आणि आपल्यालाही सत्तेत सहभागी होता येत असेल तर काय वाईट आहे, अशी मानसिकता काँग्रेसच्या आमदारांची झाली. वरिष्ठांनीही त्याला हिरवा कंदिल दाखवला, त्यामुळे काँग्रेस आघाडीत सहभागी झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.