`स्वच्छ भारत`मध्ये मुंबई महापालिकेची बनवाबनवी
स्वच्छ भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना.
दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, झी मिडिया, मुंबई : स्वच्छ भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना. यामध्ये आपण अव्वल नंबरवर यावं म्हणून मुंबई महापालिकेनं वाट्टेल ती बनवाबनवी सुरू केलीय.
आतापर्यंत तुम्ही महापालिकेतला रस्ते घोटाळा ऐकला असेल, कचरा घोटाळाही ऐकला असेल, इतकंच काय, तर नालेसफाईच्या कामातला भ्रष्टाचारही ऐकला असेल. पण आता आम्ही तुम्हाला दाखवतोय ती महापालिकेतली चक्रावून टाकणारी बनवाबनवी. ही बनवाबनवी करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं धाडस महापालिकेतल्या वरिष्ठ अधिका-यांनी केलंय.
या बनवाबनवीची गोष्ट सुरू झालीय एका अॅपवरुन. स्वच्छ भारत अभियानासाठी महापालिकेचं एक स्वच्छता MoHUA नावाचं अॅप आहे. त्यावर तक्रारी करायच्या असतात. या अॅपवर महापालिकेच्या कर्मचा-यांनीच जास्तीत जास्त तक्रारी कराव्यात, आणि त्यांचा शंभर टक्के निपटारा झालाय, असं दाखवावं, असे आदेश व्हॉटस अॅप ग्रुपवर देण्यात आलेत. ती व्हॉटसअॅप पोस्टच झी मीडियाच्या हाती लागलीय.
CITY RANKING आणि RnSwn family नावाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवरच्या या पोस्टनुसार, तक्रारी जास्तीत जास्त कराव्यात, आणि त्याच्या निपटा-य़ाचं प्रमाण शंभर टक्के असावं. दोनशेपेक्षा जास्त तक्रारी करण्याच्या सूचना कर्मचा-यांना द्या. सगळ्यांनी बाहेर जावं आणि जास्तीत जास्त तक्रारी अॅपवर कराव्यात, असे आदेश AMC EASTERN SUBURB सरांनी दिले आहेत, ही पोस्ट सध्या महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांच्या विविध व्हॉटस्अप ग्रुपवर फिरतेय. तक्रारींचं लक्ष्य गाठण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांचा प्रचंड दबाव आहे.
स्वच्छता अभियानात मुंबई महापालिकेची कामगिरी अव्वल दिसावी यासाठी कर्मचा-यांमध्ये स्पर्धा होणं हे केव्हाही शहराच्या फायद्याचंच ठरेल. पण त्यासाठी स्वतःच तक्रारी करायच्या आणि त्या सगळ्या सोडवल्या असं दाखवायचं, ही म्हणजे निव्वळ धूळफेक झाली.
मुळात या अॅपचं लॉन्चिंग महापालिकेतल्या शिवसेनेच्या नेत्यांना कल्पना न देता आयुक्तांनी ६ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करुन टाकलं त्यामुळे आयुक्तांना शिवसेना नेत्यांच्या रोषाला तोंड द्यावं लागलं होतं. आता स्वच्छ भारत अभियानात नंबर वन येण्यासाठीची ही बनवाबनवी पुन्हा महापालिकेच्या विशेषतः आयुक्तांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.