कृष्णात पाटील, झी मीडिया. मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागली असून आज संध्याकाळपर्यंत ते या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. सध्याचे मुख्य सचिव युपीएस मदान हे स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्यानं मुख्य सचिव पदाची माळ अजोय मेहता यांच्या गळ्यात पडणार आहे. तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी प्रविण परदेशी यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे ४ वर्षांहून अधिक काळ आयुक्त पदावर राहण्याचा विक्रम अजोय मेहतांनी केला आहे. १९९२ ते १९९५ या काळात ते अहमदनगरचे जिल्हाधिकारी असताना तिथल्या दुष्काळात त्यांनी चांगले काम केले होते. तसंच महावितरणला असताना त्यांनी विजेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती.


अजोय मेहतांची पालिकेतील महत्वाची कामे


- मुंबईचा २०३४ चा विकास आराखडा बनवण्याचे काम पूर्ण केले.


- महत्वाकांक्षी कोस्टल रोड सुरू करण्यात आला.


- पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने ६० सेवा ऑनलाईन केल्या.


- नालेसफाई आणि रस्ते कामांतील भ्रष्टाचार उघडकीस आणला.


- अर्धवट राहिलेली पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण केली.


- मलजल प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू केली.