मुंबई : राज्यात कोरोना पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त कारवाईचे आदेश दिले आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळणाऱ्या इमारती करणार प्रतिबंधीत केल्या जाणार आहेत. होम क्‍वारंटाईन केलेल्‍या नागरिकांच्‍या हातावर शिक्‍के मारले जाणार आहेत. विना मास्‍क रेल्‍वे प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी ३०० मार्शल नेमण्यात आले आहेत. विना मास्‍क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आणि दंड वसूल केला जाणार आहे. मंगल कार्यालये, क्‍लब, उपहारगृहं इत्‍यादी ठिकाणी धाडी टाकण्‍याच्‍या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्‍थात्‍मक विलगीकरणात असणार आहेत. रुग्‍ण वाढत असलेल्‍या विभागांमध्‍ये तपासण्‍यांची संख्‍या वाढवणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्‍लब्‍ज, नाईट क्‍लब्‍ज, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्‍कचा वापर बंधनकारक आहे. मास्‍कचा वापर होत नसल्‍याचे आढळल्‍यास आणि ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास संबंधित व्‍यक्तिंना दंड करण्‍यासोबत त्‍या-त्‍या ठिकाणच्‍या आस्‍थापनांवर, व्‍यवस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात येणार आहे.


- लग्‍नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी केली जाणार असून तिथे कोणत्‍याही नियमांचे उल्‍लंघन झालेले असेल तर दंडात्‍मक कारवाई करुन लग्‍नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्‍यवस्‍थापनांवर देखील गुन्‍हे दाखल करण्यात येणार आहे.


- सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या लोकांवर कारवाई होणार आहे. यासाठी २,४०० मार्शल्सची संख्‍या दुपटीने वाढवून ती ४,८०० इतकी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


- मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर १०० यारितीने एकूण ३०० मार्शल्‍स नेमून विनामास्‍क प्रवास करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.


- कारवाई करण्‍यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्‍यात येत असून पोलीस देखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करु शकतील.


- बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये आदी ठिकाणी आवश्‍यकतेनुसार महानगरपालिकेच्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करुन त्‍यांना विना मास्‍क फिरणाऱयांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.


- सर्वधर्मिय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे तेथे पालन होत असल्‍याबाबत लक्ष ठेवण्‍यात येईल. विना मास्‍क फिरणे, ५० पेक्षा अधिक व्‍यक्तिंनी एकाचवेळी एकत्र येणे, अशा नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास तेथेही कारवाई करण्‍यात येईल.


- खेळाच्‍या मैदानांवर व उद्यानांमध्‍ये देखील विना मास्‍क आढळणाऱ्यांवर कारवाई करण्‍यात येईल.


- झोपडपट्टी, अरुंद वस्‍ती, दाट वस्‍तींमध्‍ये बिगरशासकीय संस्‍थांच्‍या मदतीने आरोग्‍य तपासणी शिबिरांचे आयोजन करुन संशयितांची तपासणी केली जाणार आहे.