मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय दिल्याने आता पुन्हा एकदा आरक्षण सोडत काढली जाणार आहे. उद्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा सोडत काढली जाणार आहे. आता पुन्हा सोडत जाहीर होणार असल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुकामध्ये धाकधूक वाढली आहे त्याचबरोबर उत्साहदेखील निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आधी मे महिन्यामध्ये सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी काही प्रभाग महिला आरक्षित झाले होते. आता नव्याने पुन्हा सोडत निघणार असल्याने महिला आरक्षित प्रभाग पुन्हा खुले होणार का याचीच उत्सुकता इच्छुकांमध्ये निर्माण झाली आहे. काही जणांमध्ये आशा निर्माण झाली आहे तर काही जणांमध्ये धाकधूक निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. 


दिग्गजांनी वॉर्ड गमावले 
मे महिन्यात काढलेल्या सोडतीत अनेक दिग्गजांना वॉर्ड गमवावे लागले होते. तर काहींना अनपेक्षित संधी चालून आली होती. त्यामुळे तिकीट मिळेल या अपेक्षेने काम सुरु केले होते.  मात्र पुन्हा आरक्षण सोडत काढली जाणार असल्याने त्यांचीही धाकधूक वाढली आहे. तर प्रभागात पुन्हा संधी मिळेल या अपेक्षेने अनेकांमध्ये उस्ताह आहे.


तटस्थ संस्थेमार्फत पुनर्रचना, सोडत जाहीर करण्याची काँगेसची मागणी


दरम्यान आरक्षण सोडतीबरोबरच मुंबईतील प्रभाग पुनर्रचनेबाबत काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. काँग्रेसवर अन्याय करणारी सोडत आणि प्रभाग पुनर्रचना असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता. 


आरक्षण सोडत मुंबई महापालिकेने न काढता कोणत्याही तटस्थ संस्थेमार्फत पुनर्रचना आणि सोडत जाहीर केली जावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. या आधीच्या प्राधान्यक्रमानुसार काढलेल्या सोडतीस तसेच वॉर्ड पुनर्रचनेला काँग्रेसने विरोध केला  होता. याबाबत काँग्रेसने न्यायालयात धाव घेतलेत आहे.