मुंबई, नाशिक : दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या लोकांमुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना फैलावल्यानंतर अशा लोकांचा शोध अजूनही सुरुच आहे. अजूनही काही लोकांनी त्यांची माहिती देणं टाळल्यानं अखेर महापालिका आणि पोलिसांना कठोर इशारा द्यावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मरकजमध्ये सहभागी झालेले लोक मुंबईतही आले होते. एवढंच नाही तर धारावीमध्ये राहून काहीजण केरळला गेल्याची माहिती मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे धारावीत ज्या व्यक्तिनं त्यांची राहायची व्यवस्था केली होती, ती व्यक्ती कोरोनाचा बळी ठरली. धारावीत आसरा देणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर ही बाब समोर आली आणि त्यानंतर सगळेच खडबडून जागे झाले.


मरकजमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तिंचा शोध पोलीस आणि मुंबई महानगरपालिका घेत आहे. पण अजूनही काही व्यक्तिंचा शोध लागलेला नसल्यानं अखेर मुंबई महानगर पालिकेनं अल्टिमेटम दिला आहे. मुंबई महानगरपालिकेनं ट्वीट करून दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं आहे, ज्यांनी नवी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे, त्यांनी १९१६ या हेल्पलाईन नंबरवर फोन करून त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यावी. जे असं करणार नाहीत त्यांच्यावर भारतीय दंड विधान, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.


 




मुंबई पोलिसांचा इशारा


मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ मुंबई पोलिसांनीही ट्वीट करून तसाच इशारा दिला आहे. या ट्वीटमध्ये पोलिसांनी म्हटलंय, दिल्लीत निजामुद्दीन येथे तबलिगी मरकजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी असाल तर @mybmc हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाचा तपशील माहिती देणे हे तुमचे कर्तव्य आणि आमची विनंती आहे. असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.


 



नाशिकमध्येही जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा


तबलिगी जमातला जाऊन आलेल्यांनी तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः पुढे येऊन प्रशासनाला माहिती द्यावी. अन्यथा भादवि आणि जिल्हाधिकारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ३२ तबलिगी आढळले होते.