BMC Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत फलक, बॅनर्स, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण आदींबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली आहे. अनधिकृत फलक छपाई करून देणाऱ्या प्रिंटिंग व्यावसायिकांनाही नोटिसा बजावणार असल्याचं बीएससीकडून सांगण्यात आलंय. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हद्दीतील अनधिकृत फलक, बॅनर्स, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण आदींबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरातील अतिक्रमण निर्मूलन विषयक कार्यवाहीचा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती डॉ. अश्विनी जोशी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात काल आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन)  मृदुला अंडे यांच्यासह अनुज्ञापन विभागाचे आणि इतर सर्व संबंधित विभागांतील अधिकारी उपस्थित होते.


बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महानगर अधिकाधिक सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. असं असताना, बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्ते दुभाजकांमध्ये लावलेल्या अनधिकृत फलकांमुळे सुशोभीकरणात बाधा येत आहे. कोणतीही परवानगी न घेता फलक लावले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे असे अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्स व्यावसायिकांनाही नोटीस बजावण्याचे निर्देश डॉ. जोशी यांनी बैठकीत दिले. 


तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत आढळून येणारी बेवारस व भंगार वाहने हटविण्याची कारवाई करावी. पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सतत सुरू असते. मात्र यापुढे या कारवाईला वेग देण्यात यावा, त्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत लागली तरी घ्या. सर्व कारवाई करताना महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांतील तसेच विविध खात्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने मोहीम राबवावी. सहभागी सर्व संबंधित विभागांनी दररोज जी कारवाई केली, त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा, असेही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त जोशी यांनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.