Mumbai Dangerous Building : मुंबईत 216 अतिधोकादायक इमारती, महापालिकेने जाहीर केली यादी
Mumbai Dangerous Building : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 216 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. महानगरपालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे.
Mumbai Dangerous Building News : मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी आतापासून पावले उचलण्यास सुरुवात केली. पालिकेने मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. आता या धोकादायक इमारती पाडण्यात येणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मुंबई शहरात 216 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 114 इमारती पश्चिम उपनगरातील आहेत. मुंबई शहर भागातील 36 आणि पूर्व उपनगरातील 66 इमारतींचा यामध्ये समावेश आहे. याआधी पावसाळ्यात इमारती पडण्याच्या दुर्घटना घडण्याचे प्रमाणही अधिक होते. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी आता कार्यवाही सुरु केली आहे.
या धोकादायक इमारती खाली केल्यानंतर हातोडा
मुंबईत पावसाळ्यात याआधी अनेक इमारती कोसळून मोठी जीवीत हानी झाली होती. धोकादायक इमारतींना नोटीस देऊनही खाली करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे पावसाळ्यात यातील काही इमारती कोसळल्या होत्या. त्यामुळे आता यापुढे अशी मोठी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून मुंबई पालिकाने आतापासून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सध्या केवळ दोनच्यावर खासगी धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारती पूर्णत: खाली करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर हातोडा घालण्यात येणार आहे.
97 इमारती पावसाळ्याआधीच खाली करणार
मुंबई शहरात C-1 श्रेणीतील 216 इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे त्या कधीही कोसळू शकतात. पावसात या इमारतींना मोठा धोका आहे. दरम्यान, 216 इमारतींपैकी 110 इमारतींशी संबंधित प्रकरणे न्यायालयात आहेत. तर 9 इमारतींची प्रकरणे तांत्रिक सल्लागार समितीकडे आहेत. त्यामुळे उर्वरित 97 इमारती पावसाळ्याआधीच खाली करण्यात येणार आहेत. त्यानंतर पाडून टाकण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई केली जाईल.
मुंबईतील धोकादायक इमारतींची पाहणी पालिकेकडून करण्यात आली. पाच वर्षांपूर्वी मुंबईत 619 अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. काही इमारती कोसळून दुर्घटनाही घडल्या होत्या. त्यानंतर धोकादायक इमारतींपैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या. काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या नियमानुसार 30 वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी आणि पाहणी केली जाते. या ज्या धोकादायक इमारती दिसून येतात. त्यांना नोटीस बजावली जाते. त्यानुसार याहीवर्षी पालिकेने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले. यात या धोकादायक इमारती आढळून आल्यात.