मुंबईत आज फक्त महिलांसाठी लसीकरण
आज महिलांसाठी स्पेशल लसीकरण
प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : मुंबईत महिलांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. आज मुंबईतल्या सगळ्या शासकीय आणि सार्वजनिक कोविड लसीकरण केंद्रावर फक्त महिलांना लस देण्यात येणार आहे. तर उद्या २८ सप्टेंबरला फक्त विद्यार्थी आणि शिक्षकांना लस दिली जाणार आहे. तसंच उद्या दुपारच्या सत्रात लसीचा फक्त दुसरा डोस मिळणार आहे.
मुंबई महापालिकेनं गेल्या आठवड्यात महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवलं होतं. या विशेष सत्राला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्या वतीनं आज, सोमवार (27 सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं जाणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी या वेळेत असेल लसीकरण
२७ सप्टेंबर रोजी केवळ महिलांसाठी लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळमध्ये फक्त महिलांना लसीकरण सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
२८ सप्टेंबर रोजी या वेळेत असेल लसीकरण
२८ सप्टेंबर रोजी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे लसीकरण होईल. दोन्ही दिवशी सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केद्रांवर थेट लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाइन पूर्वनोंदणीची आवश्यकता नाही. सोबत ओळखपत्र, तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र आवश्यक आहे. याच दिवशी दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत दुसरी मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्यांचे लसीकरण होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.