दीपक भातुसे, मुंबई : कोरोनामुळे सरकारनं सांगितलेले सोशल डिस्टस्टिंगचे नियम धाब्यावर बसवून सुरु असलेलं बोरीवली पश्चिमेकडचं भाजी मार्केट अखेर बंद करण्यात आलं आहे. गेले काही दिवस या भाजी मार्केटमध्ये जत्रेसारखी गर्दी उसळत होती. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांनी अखेर हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरीवली रेल्वे स्टेशनबाहेर महापालिकेचं भाजी मार्केट आहे. याशिवाय रेल्वे स्टेशनबाहेरच्या रस्त्यावर मोठा भाजी बाजार भरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मुंबईत लॉकडाऊन जाहीर करताना जमावबंदी तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय संचारबंदीही लागू केली आहे. याशिवाय सोशल डिस्टसिंग ठेवण्याचे आदेशही दिले आहेत.


जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास सूट देण्यात आली आहे. त्याचाच फायदा घेऊन लोक भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत होते. बोरीवलीच्या भाजी मार्केटमध्ये तर रोज इतकी गर्दी होत होती की या भागात लॉकडाऊन केलेलंच नाही की काय अशी परिस्थिती दिसत होती. सोशल डिस्टसिंगचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले जात होते.


विशेष म्हणजे रेल्वे स्टेशनबाहेर रस्त्यावर भरणाऱ्या या भाजी मार्केटच्या एका बाजुला महापालिकेचं वॉर्ड ऑफिस आहे तर दुसऱ्या बाजुला पोलीस स्टेशन आहे. तरीही सगळे नियम धाब्यावर बसवलेले दिसत होते. मार्केटमध्ये इतकी गर्दी होत होती की लोकांना कोरोनामुळे केलेल्या उपाययोजनांचा जणू विसरच पडला होता. बुधवारी झी २४ तासनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि बोरीवलीचं हे भाजी मार्केट गुरुवारपासून बंद केलं.


 <p><iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560"></iframe></p>


मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत १३ बळी गेले असले आणि कोरोना व्हायरस अगदी झोपडपट्ट्यांपर्यंत पोहोचला असला तरी अनेक ठिकाणी लोकांना या गंभीर परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. लोक भाजी आणि अन्य वस्तूसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे काही भागात लोकांची सतत वर्दळ दिसते. कोरोनाचं संकट दिवसेदिवस अतिगंभीर होत असताना पोलीस आणि महापालिकेनं भाजी मार्केटवर निर्बंध आणण्यापासून ते लोकांची वर्दळ कमी करण्यापर्यंत अनेक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.