मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीवरून हरवलेला पाच वर्षांचा साईश मर्दे अजूनही बेपत्ता आहे. लालबागच्या राजाचे खोल समुद्रात विसर्जन करत असताना तेथील एक बोट उलटली होती. मात्र, इतर कोळी बांधवांनी तत्परता दाखवत बोटीतील पाचही जणांना वाचवले होते. यामध्ये सईशचा समावेशही होता. सुरुवातीला या सर्वांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर साईश रुग्णालयात पोहोचलाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. 
 
 अखेर चार दिवस उलटल्यानंतर पोलिसांकडून समुद्रात साईशचा शोध घ्यायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी नौदलाच्या डायव्हर्सना पाचारण करण्यात आले आहे. सध्या नेव्हीचे डायवर्स गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत. बोट उलटली होती त्या परिसरात डायव्हर्स साईशचा शोध घेत आहेत.