बुलेट ट्रेन २०२२ मध्ये !
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनला २०२२ चा मुहूर्त लाभणार आहे. सुमारे ९७ हजार कोटी रुपयांचा या प्रकल्पातील प्रारंभीचे स्थानक म्हणून बीकेसीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
रेल्वे भवनमध्ये रेल्वे बोर्डाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी बीकेसी येथील स्थानकासाठी राज्य सरकारकडून संमती मिळाल्याचीही सोमवारी ग्वाही दिली. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेसमोरील आव्हानांचा आढावा घेतानाच त्यावर मात करण्यासाठी योजना राबविल्या जात असून त्यास यश येत असल्याची भुमिका मांडली.
बुलेट ट्रेनसाठी जपानच्या ' जायका' कडून अर्थसहाय्य मिळणार असून हा प्रकल्प २०२२ मध्ये सुरू होईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी पहिले स्थानक निवडीवरून सुरू असलेला चर्चेचा घोळ मित्तल यांच्या व्यक्तव्याने मिटला आहे.
सरकारचे प्रस्तवित आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रदेखील बीकेसीमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. हे केंद्र एमएमआरडीएच्या जागेत उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे बीकेसी येथील जागेवीषयी चर्चेने वेग घेतला होता. गेल्या काही महीन्यांपासून बीकेसी येथे बुले़ट ट्रेनचे पहिले स्थानक सुरू होण्यावरून बरीच चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री फडणवीस यांना बीकेसी येथेच स्थानक उभारण्यास संमती दिल्याचे मित्तल म्हणाले.