मुंबई : मुंबईतील बुचर आयलँडला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. सकाळी 7 पर्यंत सुमारे 3 मीटर तेलाचा साठा अद्याप टाक्यांमध्ये असल्याचं सांगण्यात येतं होतं. हा साठा संपेपर्यंत ही आग अटोक्यात येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग आटोक्यात येण्यासाठी आणखी १० ते १२ तास लागण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इथे डिझेल आणि पेट्रोल घेऊन जाणा-या सर्व जहाजांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीपीटीसह मुंबई अग्निशमन दलाचे जवान शुक्रवारपासून प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे तेलाच्या टाकीवर वीज पडून ही आग लागल्याची माहिती आहे.


शुक्रवारी लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला काही प्रमाणात यशही आलं. मात्र आगीच्या उष्णतेमुळे टाकीमध्ये कोंडलेल्या वाफेचा स्फोट झाला आणि आग पुन्हा भडकली.  शेजारच्या टाक्यांना आगीपासून सुरक्षीत करण्यात आले आहे. ही आग पूर्णपणे आटोक्यात आली नसली तरी नियंत्रणात असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. या आगीत २३५ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमीक माहिती आहे.