आता घर घेणे सर्वसामान्यांसाठी होणार कठीण, घरांच्या किमती वाढणार
Mumbai and Pune : घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अधिक हाताबाहेर जाणार आहे. कारण मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागांतही घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात घर घेणे हे आता तुमचे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.
Buying a house in Mumbai and Pune : मोठी बातमी सर्वसामान्यांसाठी. यापुढे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अधिक हाताबाहेर जाणार आहे. कारण मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागांतही घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. कारण रेडिरेकनरचे दर आज जाहीर होणार आहेत. रेडिरेकनरचे दर वाढवण्यात आले तर घरांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात घर घेणे हे आता तुमचे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.
राज्यात दरवर्षी 1 एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर लागू होतात. त्याआधी 31 मार्चला राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक नव्या आर्थिक वर्षाचे रेडिरेकनर दर जाहीर करतात. दरम्यान मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्याच्या इतर भागांत रेडिरेकनर दरात विषमता दिसून आली आहे. तेव्हा यंदा रेडिरेकनर दरांचे सुसूत्रीकरण करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहेत.
घरांना ग्राहकच मिळत नसल्याचे समोर !
एकीकडे घरांच्या किंमती वाढत असताना दुसरीकडे घरांना ग्राहकच मिळत नसल्याचं समोर आले आहे. महामुंबईत साडे तीन लाख घरं विक्रीशिवाय पडून आहेत. यात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, वसई-विरार तसेच पालघरचा समावेश आहे. तसेच सीडको आणि म्हाडाकडून काढल्या जाणाऱ्या घरांच्या लॉटरीला काही ठिकांणी अल्प प्रतिसाद मिळत आहे. तसेच घरांच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अनेकांना लॉटरी लागूनही त्यांनी घरांचे पैसे भरले नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे घरं तयार असूनही खरेदीसाठी प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे.
घरांचं आकारमान आणि तिथल्या किंमतींमुळे या घरांना ग्राहकच मिळत नाही. कोरोनाचा फटका आणि गृहकर्जावरचे वाढलेले दर याचाही परिणाम घरांच्या विक्रीवर झाला आहे. तेव्हा आज जर रेडी रेकनर दरांमध्ये वाढ झाल्याय या घरांना आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्टॅम्प ड्युटी 1 एप्रिलपासून वाढण्याची शक्यता असून ती एक टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे आता खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. तसेच रेरा अंतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा राज्य सरकारने आधीच आणला आहे. त्यात आता स्टॅम्प ड्युटीत वाढीचे संकेत, यामुळे घरे घेणे अधिक महागणार आहेत.
स्टॅम्प ड्युटी 1 टक्क्याने वाढणार
तुम्ही घर खरेदी तसेच जमीन खरेदी करणार असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे मोजवे लागणार आहे. 1 एप्रिलपासून स्टॅम्प ड्युटी 1 टक्क्याने वाढणार आहे. सध्या घर आणि जमीन खरेदीवर 7 टक्के स्टॅम्प ड्युटी आहे. ही स्टॅम्प ड्युटी आता 8 टक्के होण्याची शक्यता आहे.