मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात  बैठक झाली. मातोश्रीवर शुक्रवारी ही बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी  ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीची माहिती दिलीय. मुख्यमंत्री फडणवीस आज नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी अमित शाह, आणि नितीन गडकरी यांची भेटही घेणार आहेत. पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवला तर राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. रविवारी शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्याचं अधिकृतरित्या सोशल मीडियातून सांगितलं. यावेळी शिवसेनेलाही विश्वासात घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. शुक्रवारी रात्री उशिरा 'शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धव ठाकरेजी यांची आज मातोश्री येथे भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली' असं ट्विट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय. 


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन इथं जाऊन भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर या दोघांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय.