उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का, काँग्रेस म्हणतं....
शिवसेनेच्या वतीनं मात्र ...
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: अयोध्येतील राम जन्मभूमी येथे राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख समोर आल्यानंतर आता या निमित्त नेमकी त्या स्थळी कोणाची उपस्थिती असणार यावरुन बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकासआघाडी सरकारमध्येही या मुद्द्यावरुन काहीसं दुमत पाहायला मिळत आहे.
एकिकडून काँग्रेसकडून भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा विरोध केला जात असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं मात्र उद्धव ठाकरे अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती असू शकते असं सांगण्यात आलं आहे.
सोमवारी माध्यमांशी संवाद साधाना शिवसेना नेते संजय राऊत यांनी यासंबंधीचं वक्तव्य केलं. ज्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विचारलं असता त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत या प्रश्नाचं उत्तर दिलं.
राज्यातील दूध दरवाढीसाठीसाठी होणाऱ्या आंदोलनाबाबत आपलं मत मांडल्यानंतर थोरात यांना मुख्यमंत्र्यांच्या अयोध्याभेटीविषयी आणि राममंदिर भूमिपूजनाविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी अयोध्येला जाणं हा त्यांच्या (मुख्यमंत्र्यांच्या) श्रद्धेचा भाग असल्याचं वक्तव्य केलं.
अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही- संजय राऊत
कोरोनाच्या संकटकाळात राममंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. हीच बाब उचलून धरत, श्रीराम दैवत आहे. पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसं जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरून दुर्लक्ष करण्याकरता हा राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचं, थोरात म्हणाले.