`...तोपर्यंत कोरोनावर विजय मिळवू शकत नाही`, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत मोठं विधान केलं आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत कोरोनावर औषध मिळत नाही, तोपर्यंत आपण विजय मिळवू शरत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परीसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
कोरोनाची तपासणी करण्यासाठी राज्यात १३१ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. भविष्यात राज्याला देशातीलच नाही, तर जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेलं केंद्र बनवण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला.
'कोरोना हा पहिला व्हायरस नाही, यापूर्वी एचआयव्ही,स्वाईन फल्यू यासह इतर व्हायरस होते. यापूर्वी आपण वेळ मारून नेली त्यामुळे आपल्याला यावर विजय मिळविला असे वाटले. त्याचवेळी याची चाहूल ओळखू शकलो असतो, तर लस संशोधनासाठी प्रयत्न केले असते, त्यामुळे यापुढे सतत संशोधन होत राहिले पाहिजे, तसंच तसेच हा काळ गेल्यानंतर प्रत्येक प्रयोग शाळेत एक विभाग संशोधनासाठी सुरु ठेवला पाहिजे', असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्हयात टास्क फोर्स नेमण्याबरोबरच प्रतयेक गावात कोरोना दक्षता समित्या नेमण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचित केले.
'आपण कितीही प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या पुऱ्या पडणार नाहीत, त्यामुळे जनतेला सोबत घेऊन, तसंच जनतेने सतत हात धुणे, दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवणे आणि मास्क लावण्यासाठी जनजागृती करणे, नियम कठोरपणे पाळणे गरजेचे आहे. प्रत्येकाने यापुढील काळात स्वयंशिस्त पाळली पाहिजे', असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.