मंबई : देशातील वाहतुकीचं मुख्य साधन म्हणज रेल्वे सेवा...कोरोना व्हायरसने या रेल्वे सेवेचं मोठं नुकसान केलं आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय रेल्वे देशातलं प्रवासाचं अत्यंत स्वस्त आणि सुलभ साधन. मात्र सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा रेल्वे सेवेवर मोठा परिणाम होतोय. प्रवाशांच्या संख्येत घट तर झालीच आहे. शिवाय कोरोनाच्या भीतीने लोखोंच्या संख्येने प्रवाशांनी आपलं आरक्षण रद्द केलय. यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात पैशांचा परतावा करावा लागतोय. रेल्वेलाही गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आपली तिकीटं रद्द केली. १ फेब्रुवारी ते १५ मार्चच्या दरम्यान तब्बल ८ लाख तिकीटं रद्द करण्यात आली. मार्च महिन्यातच आरक्षित तिकीटं रद्द करण्यात २५ टक्के इतकी वाढ झाली. उत्तर आणि दक्षिण रेल्वेमंडळात तिकटं रद्द करण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आलं..


अजूनही १५० ट्रेन अशा आहेत ज्या कधीही रद्द केल्या जाऊ शकतात. तसचं प्लॅटफॉर्मवरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ८४ रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात १० रुपयांवरुन थेट ५० रुपये इतकी वाढ केली आहे. तर ४९९ रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर १० वरुन २० रुपये एवढे केलेत. 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत -


- नवी दिल्लीसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांचं नियमित निर्जंतुकीकरण
- प्रवासानंतर गाड्यांच्या बोग्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण
- ट्रेनमधील पडदे काढणे, ब्लँकेट तसंच चादरींचा पुरवठा बंद
-एसी कोचमधील तापमान २५ ते २६ अंशांपर्यंत
- रेल्वेस्थानकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती
-सोशल मीडियामार्फत मदत मागणाऱ्या प्रवाशांना तातडीची मदत


यांसारखे उपक्रम राबवून रेल्वे  प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शिवाय रेल्वे कॅटरींग स्टाफलाही कडक नियम घालण्यात आले आहेत. सर्दी, खोकला, तापाची लक्षणं असणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना पॅन्ट्रीमधून बाजूला ठेवण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केवळ पाकीटबंद खादयपदार्थाची विक्री करण्यावर भर दिला जात आहे.