निसर्ग चक्रीवादळ : चक्रीवादळादम्यान प्रवास करताय, हे नक्की वाचा
सावधगिरी बाळगणं कधीची फायद्याचं.....
मुंबई : प्रशासन आणि नागरिकांना चिंतेत टाकणारं Cyclone Nisarga निसर्ग चक्रीवादळ अवघ्या काही तासांमध्ये अलिबागच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्याशिवाय, मुंबईच्या किनारपट्टीलगतही या वादळाचे परिणाम दिसून येणार आहे. वादळाचं केंद्रस्थान, वेगानं वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस असं एकंदर चित्र या वादळामुळं दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी माहिती देण्यात आली आहे.
चक्रीवादळाच्या या काळात नागरिकांना घराबाहेर न पड्याचा इशारा देण्यात आला आहे. पण, काही कारणास्तव त्यांना प्रवास करावा लागत असल्यास मुंबई महानगरपालिकेकडून काही इशारावजा सल्लेही देण्यात आले आहेत. संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार अथवा जीपनं प्रवास करताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असं साधन ठेवण्याची सूचना महापालिकेनं दिली आहे.
या गोष्टींचीही काळजी घ्या....
*पाण्यात गाडी अडकल्यास आणि ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादं साधन असणं अत्यंत गरजेचं.
*२६ जुलै २००५ चा दुर्दैवी पूर्वानुभव लक्षात घेता कार किंवा जीप ची विंडो काच फोडता येईल असे साधन गाडीमध्ये सहज हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवणं उपयुक्त.
कारण, २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीदरम्यान काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिम मध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे आणि खिडक्या उघडता न आल्यामुळं काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते.
मागील वर्षी, २०१९ च्या पावसात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, ज्यात दोन व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन अशी घटना टाळता यावी, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
पालिकेचा हा इशारा पाहता हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्यास विसरू नये. तसंच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावं असंही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवर्जून कळवण्यात येत आहे.
वाचा : CycloneNisarga : 'निसर्ग' धडकल्यास संकटसमयी काय करावं आणि काय करु नये?
दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या ३ जून २०२० रोजी 'निसर्ग' चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. त्यासोबतच देण्यात आलेल्या पावसाचा इशारा पाहता मंगळवारी सायंकाळपासून मुंबईसह उपनगरातही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असं आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आलं आहे