मुंबई : कांदळवन क्षेत्रात होत असलेल्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी आता सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६  संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणारेत. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे.


मुख्यमंत्र्यांनी कांदळवन वाचवण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्याचे तसेच सागरतटीय भागात कांदळवन वृक्षाची लागवड करण्याच्या सूचनाही दिल्या. 


खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलाला कांदळवन म्हणतात. ही खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढतेय. समुद्र लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप ही खारफुटी थांबवतात.


कांदळवनामुळे समुद्रातील अन्नसाखळी टिकून राहते. हे इतके उपयुक्त आहे, की त्सुनामीचा तडाखाही ते सक्षमपणे सहन करु शकतात.