केंद्र सरकारकडून महाराष्ट्राची आर्थिक कोंडी - मुख्यमंत्री ठाकरे
राज्याच्या हक्काचे पैसे अडवून केंद्र सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
प्रशांत अंकुशराव / मुंबई : राज्याच्या हक्काचे पैसे अडवून केंद्र सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. केंद्र सरकारने निसर्ग चक्रीवादळ आणि मास्कचे पैसेही अडवून ठेवल्याने राज्याची स्थिती अवघड झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
कोरोना संकटात राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला कर्ज काढावं लागले. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना राज्य सरकारला केंद्र सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलीय. केंद्राकडून राज्याला ३८ हजार कोटी रुपये येणं असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
निसर्ग चक्रिवादळाचे १ हजार ६५ कोटी रुपये आणि पूर्व विदर्भातल्या पूरस्थितीवेळी जाहीर केलेली ८०० कोटी रुपये मदतही केंद्र सरकारने दिली नाही. शिवाय पीपीई किट आणि मास्कचे ३०० कोटी रुपयांचा भारही राज्यावर आल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
केंद्र सरकार राज्याला मदत करत असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला आहे. या आर्थिक संकटाच्या काळात पक्षभेद विसरुन राज्याला मदत करावी ही अपेक्षा आहे.