`शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फोडणार`, बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करून नारायण राणे यांचा निर्धार
`आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव` नारायण राणेंनी दिला आठवणींना उजाळा
मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भाजपची जनआशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) सुरु झाली आहे.
शिवाजी पार्कवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत नारायण राणे यांनी मुंबई मनपा निवडणूक जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला. बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करून नारायण राणेंनी आज मुंबईत जनआशीर्वाद यात्रेची धडाक्यात सुरूवात केली. बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केल्यावर त्यांनी सावरकर स्मारकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना वंदन केलं. मुंबई मनपा निवडणूक भाजपच जिंकेल असा निर्धार त्यांनी यावेळी केला.
'आज बाळासाहेब असते तर...'
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी एवढंच सांगितलं की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलेलं आहे, आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझा आशीर्वाद आहेत. असं म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत असं मला वाटतं”, असं राणे म्हणाले.
'शिवसेनेचा पापाचा घडा फुटणार'
शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचं सरकार येईल”, असा विश्वास यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभांना गर्दी टाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावर बोलताना नारायण राणे यांनी 'आम्ही कोरोनाचे नियम पाळत आहे, आम्हाला उपदेशाची गरज नाही, असं म्हटलं आहे. जन आशीर्वाद यात्रेचा प्रतिसाद पाहता फारच कमी दिवस राहिले आहेत, वाट पाहा, असं नारायण राणे म्हणाले.