Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवर लवकरच नवी लोकल दाखल झाली आहे. मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये नवीन 12 डब्यांती लोकल दाखल झाली आहे. ही लोकल नेरूळ/ बेलापूर-उरण मार्गिकेवर धावणार आहे. या लोकलमुळं गर्दीचा भार थोडा हलका होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच प्रवाशांसाठी नेरूळ-बेलापूर हा रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला आहे. या लोकलमुळं मुंबई, नवी मुंबई, पनवेल शहरातील नागरिकांना सोयीचं झालं होतं. आता या मार्गावर नवीन लोकल दाखल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 डब्यांची नवी लोकल नेरूळ/ बेलापूर उरण या चौथ्या मार्गावर चालवण्यात येणार असून ती सध्या धावत असलेल्या 2002 -03 मधल्या रेट्रो डीसी रेकची जागा घेणार आहे. ही लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. चौथ्या मार्गावर सध्या 5 रेट्रो रेक असून त्यापैकी 3 वापरात आहेत आणि एक मेंटेनन्ससाठी ठेवण्यात येत आहेत. तर, 1 लोकल राखीव ठेवण्यात येत आहे. 


नवीन रेक अधिक आरामदायी आणि कार्यक्षम असल्याने हळूहळू सर्व गाड्या बदलण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सध्या वापरात असलेल्या रेकचे कोडल आयुष्य 25 वर्षे असून अजूनही हे रेक काही वर्ष वापरात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 


सध्या कसं आहे वेळापत्रक


नेरूळ-उरण मार्ग एकूण 27 किमीचा असून त्यात एकूण 6 स्थानके आहेत. सध्या या मार्गावर लोकलच्या अप-डाऊन 20 फेऱ्या तर उरण-बेलापूर अप-डाऊन 20 अशा फेऱ्या होतात.