Mumbai News : मध्य रेल्वेसंदर्भातील (Central Railway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  सिग्नल तोडणं, वेगावर नियंत्रण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोटरमनच्या (motorman) केबिनमध्ये सीसीटीव्ही (CCTV) लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन मध्य रेल्वेचे मोटरमन आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या सीसीटीव्हीवरुन दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लक्ष विचलतील होणार असल्याची तक्रार मोटरमन्सनं केली आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येईल असा दावा मोटरमन्सनं केलाय. मोटरमनला मार्गदर्शन द्यायचे असल्यास एका लोकलमध्ये दोन मोटरमन ठेवावेत अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे पुढील दोन दिवसांत सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव मागे न घेतल्यास अनंत चतुर्दशीनंतर आंदोलन केलं जाईल अशी भूमीका मध्य रेल्वेच्या मजदूर संघाकडून घेण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी, मध्य रेल्वेने दोन लोकल ट्रेनमध्ये सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टम (SILAS) आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) लावण्यात आली आहे. मध्य रेल्वेनुसार, या प्रणाली लोकल ट्रेन चालवण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहेत. या प्रकल्पाच्या यशामुळे त्यांचा हळूहळू सर्व लोकल गाड्यांचा विस्तार होणार आहे. मात्र, या प्रणालीवर मोटरमन खूश नसून, रेल्वे प्रशासनाने याचा वापर बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, लोकल ट्रेनमध्ये एसआयएलएएस आणि एडीएएसची अंमलबजावणी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संभाव्य धोक्यांची आधीच माहिती देऊन अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ही प्रणाली आणली आहे.


सिस्टीममध्ये मोटरमन कामावर नजर ठेवण्यासाठी केबिनमध्ये आणि सिग्नल यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी बाहेरच्या बाजूला कॅमेरा लावण्यात येणार आहे. मोटरमन्सच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवून, रेल्वेला सिग्नल जंपिंग आणि प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंगच्या घटना कमी करण्यासाठी ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे रेल्वेचं म्हणणं आहे. हा निर्णय 2016-2017 मध्ये रेल्वे बोर्डाने स्थापन केलेल्या सुरक्षा समितीच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे. सिग्नल जंपिंग आणि रुळावरून घसरणे यासह मोटरमनद्वारे मोबाइल फोन वापरण्यासारख्या घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.


प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असला तरी काही मोटरमननी त्यांच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मुंबई विभागाचे अध्यक्ष विवेक सिसोदिया म्हणाले की, सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर्सवर दबाव येऊ शकतो आणि त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या मोटरमनच्या बैठकीत गणेशोत्सवानंतर आंदोलन केले जाईल अशी भूमिका सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने घेतली आहे.