एसी लोकलविरोधात प्रवाशांचा उद्रेक, बदलापूरात स्टेशन मास्तरांना घेराव
एसी लोकलविरोधात प्रवाशांचा का वाढतोय रोष?
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : रेल्वे प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी पश्चिम (Western) आणि मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर एसी लोकल (AC Local) सुरु करण्यात आल्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसी लोकलची संख्याही वाढवली जाणार आहे. आधीच मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालवल्या जात आहेत.
मात्र वातानुकूलित लोकलचं तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठच फिरवली आहे. इतकंच नाही तर एसी लोकलविरोधात प्रवाशांचा रोषही वाढत चालला आहे. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांची नाराजी ओढवून घेतली आहे.
याचाच प्रत्यय आज मध्य रेल्वेवरच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर (Badlapur Railway Station) पाहिला मिळाला. सामान्य लोकल रद्द करुन एसी लोकल चालवण्याने प्रवाशांचा उद्रेक झाला. संतापलेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना (Station Master) घेराव घातला. ऐन गर्दीच्यावेळी सामान्य लोकल रद्द केल्याने प्रवासी चांगलेच भडकले. प्रवाशांचा उद्रेक पाहता पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत जमाला पांगवलं.
तसंच स्टेशन मास्तर यांनी वरिष्ठांना याबाबत कळवू असं आश्वासन प्रवाशांना दिलं. एसी लोकल रद्द केल्याने त्यानंतर आलेल्या सामान्य लोकलला प्रवाशांची गर्दी वाढली. मध्य रेल्वे मार्गावरच्या कळवा स्थानकातही एसी लोकल रोखून धरण्याचा प्रकार घडला होता.
ठाणे-दिवा पाचवा आणि सहावा मार्ग झाल्यानंतर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होईल असं सांगण्यात आलं, पण एसी फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवासी चांगलेच नाराज झाले.
मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या किती फेऱ्या
मध्य रेल्वे मार्गावर सध्या सहा एसी लोकल असून दररोज 66 फेऱ्या होतात. सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा अशा एसी लोकलच्या फेऱ्या आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरही एसी लोकल सुरु करण्यात आल्या होत्या पण प्रवशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता.