...असा असेल ट्रान्स-हार्बर रेल्वे प्रवाशांचा गारेगार प्रवास!
सुरुवातीला १६ फेऱ्या असणाऱ्या या रेल्वेचं तिकीट पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलप्रमाणेच आहे
कपिल राऊत / स्वाती नाईक, झी २४ तास, नवी मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे वाशी पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गारेगार होतोय. कारण या रेल्वे मार्गावरून पहिल्या वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाडी धावायला सुरुवात झालीय.
मध्य रेल्वे विभागात अनेक वर्षापासून एसी लोकल धावेल अशा फक्त चर्चाच रंगत होत्या. मात्र, अखेर मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर पहिली एसी लोकल धावली आणि प्रवासांनी गारेगाव प्रवास अनुभवला. पहिल्याच दिवशी फुलांनी सजवलेली एसी लोकल प्लॅटफॉर्मवर आली. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी पनवेल-ठाणे लोकलला हिरवा झेंडा दाखवत या लोकलची सुरुवात केली.
सध्या एक रेक आली आहे अजून रेक आल्यावर सुविधा वाढवण्यात येईल. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून मग ही रेल्वे सेवा वाढवण्यात येईल, असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे, या गाडीचे सारथ्य मोटरवुमन मनीषा मस्के यांनी केलं तर गार्ड म्हणून श्वेता घोणे यांनी काम पाहिलं. यावेळी, रेल्वे सेवा करताना आपल्याला १७ वर्ष झाली. यात एसी लोकल चालवायला मिळाली याचा आनंद आणि अभिमान आहे, असं मोटरवुमन मनिषा म्हस्के यांनी म्हटलं. तर एसी लोकल असल्याने टॉक-बॅक सिस्टिमद्वारे प्रवाशांशी संवाद साधता येईल. ऑटोमॅटिक डोअर सिस्टम असल्यानं प्रवाशांनाही दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया गार्ड श्वेता घोणे यांनी व्यक्त केली.
रोजच्या वैतागवाण्या प्रवासात आता एसी लोकलमुळे काही तास का होईना पण गारेगार, शांत प्रवास होणार असल्याने पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.
सुरुवातीला १६ फेऱ्या असणाऱ्या या रेल्वेचं तिकीट पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलप्रमाणेच आहे. त्यामुळे एकुणच गारेगार प्रवास, ऑटोमेटिक डोअर सिस्टीम यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार असल्याने जर प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला तर नक्कीच येत्या काळात एसी लोकलची संख्या वाढेल यात शंकाच नाही.