देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : दिवाळीनिमित्त (Diwali) रेल्वे स्थानकावर होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्लॅटफॉर्म तिकिटाचा (platform ticket) दर वाढवला आहे. या सणासुदीच्या काळात, रेल्वे स्थानकांवर (Railway Station) गर्दीच्या वेळी गोंधळ टाळण्यासाठी आणि अनावश्यक लोकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने आपल्या काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट (platform ticket) दरात वाढ केली आहे. आज सकाळपासूनच वाढलेले दर लागू झाले आहेत. (Platform Ticket Price Hike)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शनिवारपासून मुंबईसह गुजरातमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर आता 10 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मात्र, या किमती तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आल्या आहेत. ही दरवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत लागू राहणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल, दादर ,बोरीवली, वांद्रे टर्मिनसवर प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्यात आली आहे.


मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) शिवाजी सुतार यांनी शुक्रवारी सांगितले की, नवीन दर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल येथे लागू होतील. ही स्थानके लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी सर्वात जास्त गर्दी असणारे जंक्शन आहेत.


सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता ही वाढ करण्यात आल्याचेही शिवाजी सुतार यांनी सांगितले. प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये अशी तात्पुरती वाढ मुंबईच्या विभागीय रेल्वेने गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा लागू केली आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना आणि सुरत या स्थानकांवर दरवाढ करण्यात आलीय.



दरम्यान, दिवाळी आणि छठच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सातत्याने नवीन गाड्या चालवल्या जात आहेत.