धक्कादायक! मुंबईत २२ कोटीचं बनावट इनपूट टॅक्स रॅकेट उघड, २ व्यापारी अटकेत
हे दोनही व्यापारी धातुशी संबंधित भंगाराचे व्यापारी असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपींमध्ये एक वडील आणि दुसरा त्यांचा मुलगा आहे.
मुंबई : ठाणे cgst मुंबई झोन अधिकाऱ्यांनी २२ कोटी रुपये बनावट ITC नेटवर्कचा पडदाफाश केला आहे. यात भंगाराचा व्यापार करणाऱ्या २ व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना कोर्टाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे दोनही व्यापारी धातुशी संबंधित भंगाराचे व्यापारी असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपींमध्ये एक वडील आणि दुसरा त्यांचा मुलगा आहे. या दोघांना सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132(1)(b) आणि (c) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करून मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड, मुंबई यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये मेसर्स शाह एंटरप्राईजेस आणि मेसर्स यूएस एंटरप्राईजेस असे दोन वेग वेगळी कार्यालयं आहेत. या संबंधित २ कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादीच्या व्यापारासाठी जीएसटीकडे नोंदणीकृत आहेत. ११.८० कोटी रुपये आणि १०.२३ कोटी रुपयांची बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट घेऊन, त्यांना मंजूर करण्याच्या प्रक्रियेत या आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट हे बनावट संस्थांकडून मिळवून ईतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या.
प्रामाणिक करदात्यांना अनुचित स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि योग्य कर न भरून फसवणूक करणाऱ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी सीजीएसटी मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती.
येत्या काही दिवसांत फसवणूक करणाऱ्या आणि करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम विभाग अधिक तीव्र करणार आहे अशी माहिती ठाणे आयुक्तालयाचे सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.