दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : माजी उपमुख्यमंत्री  छगन भुजबळ यांना शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांची तांत्रिक सुटका, आज रविवारी रूग्णालयातच झाली. तरीही छगन भुजबळ यांचा मुक्काम अजून ४ ते ५ दिवस केईएम रुग्णालयातच असणार आहे, पोलिसांनी रूग्णालयात भुजबळांच्या सह्या घेतल्या आणि त्यांची तांत्रिक सुटका झाली. मात्र आता सुटकेची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरही भुजबळ आणखी ४ ते ५ दिवस केईएम रुग्णालयातच थांबून उपचार घेणार आहेत. शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर सलग २ दिवस सुट्ट्या असल्यामुळे भुजबळ यांची सुटका होऊ शकली नव्हती, ती आज झाली, सध्या प्रकृती ठिक नसल्याने भुजबळांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


आणखी ४ ते ५ दिवस भुजबळ केईएममध्येच


मात्र उद्या सुटकेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली तरी भुजबळ केईएममधून बाहेर येणार नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी ४ ते ५ दिवस भुजबळ केईएममध्येच उपचार घेणार आहेत. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवलं जाण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यानंतर भुजबळ केईएम रुग्णालयात बाहेर येतील आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील अशी चर्चा सुरू होती. मात्र प्रकृतीच्या कारणांमुळे सध्या तरी भुजबळ कोणत्याही जाहीर कार्यक्रमात जाणार नसून चांगले उपचार घेणे ही त्यांची प्राथमिकता असल्याचे सांगितले जात आहे.