अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणच्या मुद्द्यावरून आणि या विषयाची चर्चा सुरू असताना भाई जगताप यांच्या वक्तव्यावरून विधानपरिषदचे कामकाज तब्बल पाचवेळा तहकूब करावे लागले. अखेर दुपारी दोन वाजेपर्यंत सभागृहातील गोंधळ कायम राहिल्याने सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिवसभराकरता कामकाज तहकूब केले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदच्या विशेष बैठकीत अल्पकालीन चर्चेद्वारे धनगर आरक्षणचा मुद्दा रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केला. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार हे शिफारस केंद्र सरकारला का करत नाहीये, 'टीआयएसएस'चा अहवाल सरकार का मांडत नाही, असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले.


दरम्यान आरोप प्रत्यारोप करतांना भाई जगताप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे इतका वेळ शांत बसलेले सत्ताधारी आक्रमक झाले.


मराठा आणि धनगर आरक्षण हे कोणाच्या बापाची जायदात नाही, असे व्यक्तव्य भाई जगताप यांनी केल्याने सत्ताधारी आक्रमक झाले. त्यावेळी सत्ताधारी - विरोधक आक्रमक परस्परांविरुद्ध घोषणाबाजी करत असल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे तब्बल पाचवेळा विधानपरिषदचे कामकाज तहकूब करावे लागले.


दरम्यान विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी महसूल मंत्री यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करताच सत्ताधारी हे वेलमध्ये घोषणाबाजी करत उतरले. 


यामुळे सभापतींनी दिवसभराकरता विधानपरिषदचे कामकाज तहकूब केले. त्यामुळे विधानपरिषदमध्ये आज कोणतेही इतर महत्त्वाचे कामकाज झाले नाही.