मुंबई : मुंबई शहरात आणि उपनगरात शनिवारपासून पावसाने थैमान घातलं आहे. दरम्यान रौद्र रूप धारण केलेल्या पावसाने मुंबईत दुर्घटना घडल्या. चेंबूर, भांडूप आणि विक्रोळी अशा तीन ठिकाणी या दुर्घटना घडल्याचं समोर आलं. दरम्यान या दुर्घटनांमध्ये एकूण 33 जणांचा बळी गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे मुंबईत दरडी कोसळून 33 बळी घेतला आहे. यामध्ये चेंबूरमध्ये 21 जणं तर विक्रोळीमध्ये 10 तर भांडूपमध्ये एकजण मृत्यूमुखी पडलं आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलीये. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही 2 लाखांची मदत देणार असल्याचं सांगितलं. 


मुंबईमध्ये शनिवार मध्यरात्रीपासून पाऊस बरसतोय. तर आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढच्या काही तासांसाठी हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण, पश्चिम - मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवाय रत्नागिरीमध्येही मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. 


दरम्यान ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातल्या मानपाडा मुल्ला भागात असलेल्या कॉसमॉस इमातीची संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत 5 चार चाकी आणि 5 दुचाकी वाहनांचं नुकसान झालंय. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.


तर मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं. बोईसर, डहाणू या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. सफाळे येथील नंदाडे गावात घरांमध्ये पाणी शिरलं. इथल्या 40 ते 50 घरांतील लोकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आलं. स्थलांतरितांच्या राहण्याची सोय शाळेत करण्यात आली.