दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळणार आहे. आता जामिनावर बाहेर आलेल्या भुजबळांची प्रकृती चांगली झाली तर राष्ट्रवादीसाठी ती आनंदाची बाब असणार आहे आणि त्याचवेळी भाजपासाठी भुजबळ डोकेदुखी ठरू शकतात. १४ मार्च २०१६  रोजी छगन भुजबळ तुरुंगात गेले... तब्बल दोन वर्षं भुजबळांचा मुक्काम होता. आता अखेर भुजबळांची सुटका होतेय. भुजबळांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेससाठीही हा मोठा दिलासा आहे.


राष्ट्रवादीला धक्यावर धक्के... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ साली सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यातला आलेख खालावत चालला होता. त्यातच पक्षाचा चेहरा असलेले आर आर पाटील यांचं निधन झाल्यानं पक्षाला मोठा धक्का बसला. आबांच्या निधनाच्या धक्क्यातून राष्ट्रवादी सावरत असतानाच १४ मे २०१६ रोजी भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटक झाली. या काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जनाधार गमावता होता. अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे हे पक्षाचा किल्ला लढवत होते. पण, भाजपाला आपल्या खास आक्रमक शैलीत अंगावर घेईल असे आर आर पाटील आणि छगन भुजबळ यांची कमतरता सातत्याने पक्षाला जाणवत होती. विधानसभेतही या दोन नेत्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.


राष्ट्रवादीला मिळणार नवी ऊर्जा


भुजबळांच्या 'समता परिषद' या ओबीसी संघटनेचा फायदा पक्षाला होत होता. मात्र भुजबळ तुरुंगात असल्याने समता परिषदेचं कामही थंडावलं होतं. आता भुजबळ जामिनावर बाहेर आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक नवी ऊर्जा मिळणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याची ताकद भुजबळांमध्ये आहे, त्याचा फायदाही पक्षाला होणार आहे.


जामिनावर बाहेर येऊन भुजबळ तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होण्याची शक्यता आहे. प्रकृती ठणठणीत झाली आणि कोणतीही कायदेशीर अडचण नसेल तर भुजबळांची तोफ राष्ट्रवादीच्या व्यासपीठवरून धडधडताना दिसेल. भुजबळांची ही जामिनावरील सुटका भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते. सव्वा दोन वर्ष तुरुंगात गेल्यानं आणि या काळात उपचारांसाठी भुजबळांना न्यायालयात झगडावं लागल्यानं ते प्रचंड दुखावले आहेत. या सगळ्या मागे भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोप अनेकदा भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे दुखावलेले भुजबळ भाजपा विरोधात निश्चितच अधिक आक्रमक होतील. दुसरीकडे राज्यातील ओबीसींना पुन्हा एकत्र करण्याचं कामही भुजबळ हाती घेण्याची शक्यता आहे. ती बाबही भाजपासाठी अडचणीची ठरू शकते. भुजबळांची जामिनावरची सुटका ही आगामी काळत राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरू शकते.