मुंबई : ५८ मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. जमेल तिथे भाजपच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासने दिली. पण ना मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली, ना मेगा भरती झाली. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, अशी टीकाही संघटनेने केली आहे. सरकारकडून मराठा समाजातील मुलांवर दाखल झालेला एकही गुन्हा मागे घेतलेला नाही. याचे लेखी आश्वासन देऊनही गुन्हे मागे घेतले नाहीत. १७ फेब्रुवारीला बैठक घेतली.  आचार संहितेआधी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर लोकसभेला 'कमळा'वर बहिष्कार टाकण्याची मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नाराज असलेल्या मराठी क्रांती मोर्चानं आगामी लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. मुंबई, ठाणे आणि सोलापूर याठिकाणच्या पाच जागांची चाचपणी सुरु असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे. याआधी मराठा समाजातील काही जणांना हाताशी धरून सरकारधार्जिणी भूमिका घेण्यास भाग पाडण्यात आलं होतं. मराठा क्रांती मोर्चात फूड पाडण्याचा तो प्रयत्न होता. आता संघटनेनं थेट रणमैदानात उतरण्याचे ठरवले आहे. पण या नाराजीचा फटका सत्ताधारी भाजपाला बसेल की, विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला याची चर्चा आता सुरू झाली आहे.


मराठा मोर्चाची पत्रकार परिषद


- 'मराठा सामाजाची फसवणूक झाली,अजूनही आरक्षणाची अंमलबजावनी नाही.
- मेगाभरतीत लाभ मिळणार नाही, असे निवेदन सरकारकडून न्यायालयात सादर करण्यात आले'
- 'मराठा समाजाचा लाभ कोणालाही घेता येत नाही'
- आधीच्या सरकारनेही फसवणूक केली, हे सरकारपण तेच करत आहे. 
- मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले पण प्रत्यक्षात काहीच केले नाही
- अनेक वेळा आश्वासन देऊनही मागण्या प्रलंबीतच आहेत
- 'सार्थी योजनेचे मुख्यमंत्र्यांकडून पुण्यात उद्घाटन पण प्रत्यक्षात तिथे काहीच काम सुरु झालेले नाही'
- कोपर्डी प्रकरणात अद्याप फाशी नाही.
- शिवस्मारकाचे काम प्रलंबित, 
- सरकार न्यायालयात बाजू मांडू शकत नाही. 
- आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी केली, पण त्यावरही काहीही नाही


मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांचा राडा


दरम्यान, गेल्या आठवड्यात मराठा समाजाच्या नागरिकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मदत महामंडळाचा लाभ मिळत नसल्याने मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी महामंडळ कार्यालयात राडा घातला. अण्णासाहेब पाटील महामंडळच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या तोंडावर फाइल फिरकवल्या. काही कागदपत्र फाडत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला. फाइल मंजूर होत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठा समाजाच्या युवकांना या मंडळाचा फायदा होत नसल्याने हा संताप व्यक्त केला असून यानंतर मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता.