मुंबई : डोंगरी परिसरात म्हाडाची चार केसरबाई ही मजली इमारत कोसळली. यात १२ जणांचा मृत्यू झाला. या इमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही इमारत १०० वर्षे जुनी आहे. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासक नियुक्त केलेला होता. मात्र, म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विकासकाने काम वेळत केले की नाही याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास प्राथमिकता देण्यात येत आहे. हा भाग अत्यंत दाटीवाटीचा आहे. तिथे गर्दी न करता बचावकार्य चालले पाहिजे. जखमींना योग्य मदत करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. त्या ठिकाणी १५ कुटुंबे राहत होती, अशी माहिती आहे. मात्र, या १५ कुटुंबीयांपैकी त्यातील किती जण घरी होते आणि किती बाहेर याची माहिती नाही.  सध्या सर्व लक्ष मदतकार्यावर केंद्रीत केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.



डोंगरी इथल्या अब्दुल रहमान शाह दर्ग्याच्या मागे ही इमारत होती. कोसळलेल्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.