पाया पडा, सेटिंग लावा... जामीन मिळणार नाही? आता भरधाव गाडी चालवताना दहा वेळा विचार करा
रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याने अपघाताच्या अनेक घटना घडतात. यावर आळा घालण्यासाठी आत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई : रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवाल तर खबरदार. कारण आता रॅश ड्रायव्हिंगसाठी (Rash Driving) जेल तर होईलच मात्र बेलही मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. विना परवाना तसंच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध ( Drivers of Public Transport services) अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव (Proposal) केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई (Strict legal action) आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रविंद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी यावेळी उपस्थित होते.
बेदरकारपणे तसंच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालिवण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2021 मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या 20 हजार 860 आहे तर त्यात 9829 जणांचा मृत्यू झाला आहे.
गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणं हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू यासाठी वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणं आवश्यक आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसंच मद्यपी वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सुचना फलकांसोबतच रंब्लर बसविणे यासारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्रीशिंदे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रस्ते अपघातात वाढ
भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या खूप वाढली आहे. यात सर्वाधिक अपघात बेदरकारपणे गाडी चालवल्याने होत असल्याचं नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालात म्हटलंय. याशिवाय रस्त्यांची खराब स्थिती, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन यासह अनेक कारणांमुळे अपघात होतात.