मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसर्‍या माळ्यावर राहत होते. २२ वर्षे येथे त्यांचे वास्तव्य होते. हे निवासस्थान देखील राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मान्यवरांनी या चाळीला महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताने आज भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी महापरिनिर्वाण दिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना सकाळी चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी परळच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आंबेडकर ज्या ठिकाणी राहायचे तेथे प्रत्यक्ष भेट दिली. आजवर या ठिकाणी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी परळमधील बीआयटी चाळीची पाहणी केली नव्हती. येथील आंबडेकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



दरम्यान, दादरच्या चैत्यभूमीवर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आंबेडकर यांना अभिवादन केले. ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो अनुयाची दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने दाखल झालेत.