मुंबई मेट्रोच्या पहिल्या स्वदेशी कोचचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन
मेट्रोच्या पहिल्या भारतीय कोचचं (first Indian coach of Mumbai Metro) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
मुंबई : मेट्रोच्या पहिल्या भारतीय कोचचं (first Indian coach of Mumbai Metro) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. पहिल्या सहा मेट्रो ट्रेन येत्या सहा महिन्यात दाखल होतील. तर दर महिन्याला तीन याप्रमाणे उरलेल्या मेट्रो पुढच्या तीन वर्षात येतील. मेट्रोच्या एका डब्ब्यातून 380 प्रवासी तर एका मेट्रो रेल्वेतून 2 हजार 280 प्रवासी प्रवास करू शकतील. दहीसर ते डीएननगर ही मेट्रो 2 अ आणि दहीसर ते अंधेरी मेट्रो 7 च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मेट्रोची सफर करता येणार आहे.
भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातील तीन ते चार वर्षे मुंबईसाठी विशेष असतील. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मेट्रो मार्गिका 7 व 2 (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो कोचचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उद्घाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, कपिल पाटील, विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबईचा विस्तार होतोय. मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईला नियोजनबद्ध आखीवरेखीव स्वरूप देत आहोत. आजचा दिवस मुंबईसाठी वैशिष्ट्यपूर्ण असून या शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
कोरोना काळात मुंबईची लोकल सेवा बंद होती. ती 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करणे आणि गर्दी होणार याची दक्षता घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
लोकलला मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण कमी होणार आहे. मुंबईत मेट्रोची जेवढी कामे सुरू आहेत तेवढी जगात कुठेही सुरू नसतील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. कुठल्याही विकासकामांना थांबवले नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती देताना जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचं काम सरकार करीत असल्याने हे लोकाभिमुख सरकार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.