मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन शिथिल करताना काळजी घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत. राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढणार आहे असे ते म्हणालेत. त्यामुळे करोना नियंत्रणासाठी जास्त गांभीर्याने काम करा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या 'महात्मा फुले जन आरोग्य' या  देशातील महत्त्वाकांक्षी योजनेची प्रत्येक जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. नागपूर, यवतमाळ, सोलापूर, पुणे, सातारा, ठाणे आदि जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांशी चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.



तुम्ही सर्वच जण अतिशय तळमळीने रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. पण आता आकडेवारीपेक्षा तुम्ही रुग्णांना काय सुविधा देत आहात, त्यांना कसे बरे करीत आहात, उपचारांचे कसे नियोजन केले आहे याला महत्त्व आहे. संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णांची नियमित तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासावी, रक्तदाबाकडे लक्ष ठेवावे. चाचणीही लक्ष्य केंद्रित असावी. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर घराघरांत सर्वेक्षण करुन रुग्ण शोधणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.