कोरोनाचे सावट जाऊ दे ! आनंदी राहा, सुरक्षित रहा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Temples in Maharashtra to reopen : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मुंबादेवीचे (Mumbadevi) दर्शन घेतले.
मुंबई : Temples in Maharashtra to reopen : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मुंबादेवीचे (Mumbadevi) दर्शन घेतले. आनंदित राहा, मात्र, कोरोनाचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा, असे त्यांनी जनतेला आवाहन केले. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली आहे. धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या.
सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली. तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड आणि तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.
आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात आली आहेत. मुंबई, पुणे, पंढरपूर, कोल्हापूर आणि तुळजापूरसह सर्व ठिकाणावर भक्तीमय वातावरण आहे. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.