मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट ठरले आहेत. इथल्या रुग्णांचा वाढता आलेख खाली आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यातल्या इतर ठिकाणांसह या तीन ठिकाणी अधिक लक्ष सरकार आता देणारे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं कॉर्पोरेट रुग्णालयातील डॉक्टर आणि सीईओंशी संवाद साधला. आता 'कोरोनाचा वाढता आलेख खाली आणायचाय', मृत्यू होऊ न देणं हेच यापुढचे मोठे आव्हान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याबाबत आता खासगी रुग्णालयांनी अधिक पुढाकार घ्यावा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरची उपचार पद्धती तसेच गंभीरावस्थेतील रुग्णांना कसे वाचवायचे या व अशा इतर वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील प्रमुख कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स देखील सहभागी होते, त्यांनी देखील त्यांचे विचार मांडले. 


या बैठकीत सैफी, फोर्टिस, वोकहार्ट, हिंदुजा, हिरानंदानी, कोकिळाबेन, नांवाती, सेव्हन हिल्स त्याचप्रमाणे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव सौरव विजय,  सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, रामास्वामी, डॉ संजय ओक आदी उपस्थित होते.  


कोरोना लागण झालेल्या रुग्णांची देखभाल, त्यांच्यावरील उपचार हा एकूणच कोरोना साथीमधला महत्वाचा भाग आहे. रुग्णांना लवकर बरे करणे, मृत्यू होऊ न देणे हे सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रासमोराचे आव्हान आहे. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत उत्तम रुग्ण व्यवस्थापन झाले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 


उपचार सुरु असतांना रुग्णांची कशा रीतीने काळजी घ्यावी, वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता, प्रमाणित उपचार पद्धती,आयसीयु बेड्सची उपलब्धता, यावर विस्तृत चर्चा झाली. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांना बाधा होऊ नये हे सर्वात महत्वाचे आहे. कोवीड-१९ उपचारासाठी जी तीन प्रकारची रुग्णालये निश्चित केली आहेत, त्याचे नियोजन व त्यांच्यातील समन्वय व्यवस्थित असणे गरजेचे आहे यावरही चर्चा झाली.