गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई  : एक बालकलाकार, आता कुठे त्याच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. हसरा, खेळकर आणि प्रफुल्लित अशीच त्याची इंडस्ट्रीमधली ओळख. नुकताच त्याचा सिनेमाही प्रदर्शित झाला होता. सगळं काही सुरळीत सुरू असताना त्यानं अचानक एक्झिट घेतली. बालकलाकार प्रफुल्ल भालेरावची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. कुंकूमधल्या त्याच्या एखाद्या डायलॉगनं सुरुवात करावी.


प्रफुल्ल घराघरांत पोहोचला होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंकू मालिकेतला गण्या, अर्थात जानकीचा भाऊ म्हणून प्रफुल्ल घराघरांत पोहोचला होता. तू माझा सांगाती मालिकेतही तुकोबांच्या जावयाची भूमिका प्रफुल्लनं साकारली होती. लहान वयातही संवेदनशील आणि मेहनती बालकलाकार अशी प्रफुल्लची ओळख होती. 


वातावरण नेहमी हसतं खेळतं ठेवायचा


अभिनय विशेषतः नाटकांची त्याला आवड होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बारायण सिनेमातही प्रफुल्लनं नायकाच्या मित्राची भूमिका केली होती. अतिशय खेळकर आणि हसरा असणारा प्रफुल्ल सेटवरचं वातावरण नेहमी हसतं खेळतं ठेवायचा.


सिग्नलच्या खांबावर त्याचं डोकं आपटलं


प्रफुल्ल मालाडमधल्या एका कंपनीत काम करत होता. तिथली नाईट शिफ्ट संपवून तो पहाटे घरी जायला निघाला.  प्रफुल्लनं मालाड स्टेशनवरुन पहाटे चार बाराची चर्चगेट लोकल पकडली.  तो दरवाजात उभा होता. त्यावेळी सिग्नलच्या खांबावर त्याचं डोकं आपटलं.  त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यातच प्रफुल्लचा मृत्यू झाला.


धावत लोकल पकडण्याच्या नादात प्रफुल्लचा हकनाक बळी गेला, आणि अतिशय कोवळ्या वयातल्या हरहुन्नरी कलाकारानं अकाली एक्झिट घेतली.