उर्मिला मातोंडकरच्या सभेत राडा, भाजप विरूद्ध काँग्रेस संघर्ष
बोरिवलीत उर्मिला मातोंडकरच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी घुसून राडा केला.
गणेश कवडे, मुंबई : उत्तर मुंबईतले उमेदवार उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. बोरिवलीत उर्मिला मातोंडकरच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी घुसून राडा केला. भाजपानं मात्र हे कार्यकर्ते आपले नसल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनीही मारहाण झालेले प्रवासी असल्याचं सांगितलं आहे.
उर्मिला मातोंडकरच्या सभेत काही जणांनी गोंधळ घातला. सभेत मोदी-मोदीच्या घोषणा देखील सुरु होत्या. उत्तर मुंबईतून भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींविरोधात जेव्हा उर्मिला मातोंडकरच्या नावाची घोषणा झाली तेव्हा हा सामना एकतर्फी होईल अशी शक्यता वाटत होती. पण उर्मिलाच्या आक्रमक प्रचारामुळे भाजपलाही तिची दखल घ्यावी लागली. प्रचारात आक्रमक झालेल्या उर्मिलाविरोधात बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर घोषणाबाजी झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांशी झटापट झाल्याचा दावा उर्मिलानं केला आहे.
दरम्यान उर्मिलाच्या सभेत झालेला गोंधळ रेल्वे प्रवाशांनी घातल्याचा दावा भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींनी केला आहे. मतदानाला अजून बरेच दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत उत्तर मुंबईत भाजप विरूद्ध काँग्रेस हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.