नवी मुंबई : संपूर्ण राज्यात लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र कधी येणार आणि युतीची घोषणा कधी करणार. हा मुहूर्त अजून ठरत नसला तरी उद्या नवी मुंबईत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर येणार आहेत. माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त आणि वडार भवनाला सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आणि ती घटस्थापनेपर्यंत अंतिम टप्प्यातच राहणार आहे. नवरात्रीचे घट बसेपर्यंत युतीचे घट काही बसणार नाहीत. कारण युती जाहीर करण्यात पितृपक्षाचा अडसर आहे. आता युतीची चर्चा ही फक्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातच सुरू आहे. पण २९ तारखेपर्यंत कुठलीही घोषणा होणार नाही. तोपर्यंत सुरू राहील तो फक्त टाईमपास आणि डायलॉगबाजी.


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही हेच झालं. युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ पितृपक्ष संपेपर्यंत संपलं नाही. आणि घटस्थापनेला युतीचा घडा फुटला.
  
आता पक्षांमध्ये काही जागा वगळता कुठलाही तिढा नाही, युतीसाठी शिवसेनेनं भाजपशी केव्हाच जुळवून घेतलं आहे. अजून उमेदवार जाहीर नाहीत, कुंपणावरचे अजूनही अस्वस्थ आहेत. पितृपक्ष संपल्याशिवाय युतीची घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे.